मराठी माणसासाठी-शेअरबाजाराचे फायदे,धोके व त्यावरील उपाय.


मित्रहो, याआधीच्या पोस्टमध्ये उत्तम दर्जाच्या शेअर्सचा उल्लेख मी केला होता. शेअरबाजारात गुंतवणूक करण्यातला अतिशय महत्वाचा भाग म्हणजे ज्यात आपला घामाचा पैसा ओतायचा त्या "शेअर्सची निवड" हे आपल्याला माहीतच आहे. शेअर्सची निवड करताना त्या कंपनीचा म्हणजेच तिच्या बिझिनेसचा अभ्यास करणे आवश्यक असते, त्यालाच ' फंडामेंटल ऍनालिस ीस ' म्हणतात. मात्र सर्वचजणांना असा अभ्यास करता येणे जमेल का ? करता येणे जमेल का ?

खरं सांगू का ? मलाही त्यातले फार काही कळत नाही.

मात्र 'फंडामेन्टल' म्हणता येईल अशा सर्वच बाबींचा अभ्यास तर सोडाच, पण एखाद्या महाकाय कंपनीच्या सर्व व्यावसायिक आणि आर्थिक आणि राजकिय बाबींची तसेच भविष्यातल्या योजनांची साधी माहिती - (म्हणजे खरी-खुरी) तरी पूर्णपणे सामान्य माणसापर्यंत पोचत असेल का याबाबत मला शंका आहेत. मग माझ्यासारख्या अनेकजणांना बाजारात फायदा मिळवणे शक्यच नाही का? तर असे मात्र मुळीच नाही.

हा ब्लॉग अल्प मुदतीच्या (SHORT TERM) गुंतवणूकीला वाहिलेला असला तरी तशा प्रकारची SHORT TERM गुंतवणूक सुद्धा नक्की कुठल्या शेअर्स मध्ये करायची हे ठरवताना कंपनीच्या काम गिरीचा विचार करावाच लागतो. आणि आपल्याला माहितच आहे कि एखाद्या कंपनीच्या सर्व फंडामेन्टल्सचा परिणाम त्या शेअरच्या किंमतीवर होत असतो, सर्व चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब बाजारातल्या किंमतीवर पडतच असते हे तर "टेक्निकल ऍनलिसीस" चे मुळ गृहितक आहे.

मग याच आधारावर असेही म्हणता येइल कि (या आधीची पोस्ट कृपया पुन्हा वाचा )उत्तम कंपनीत केलेली गुंतवणूक ही दीर्घ मुदतीमध्ये फायदेशीर ठरायला हवी, म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्सची किंमत दीर्घ काळापासून स्थिरपणे वाढत आहे, ती कंपनी उत्तम आहे असे मानायला ढोबळ मानाने जागा आहे. प्रत्येक कंपनीची पूर्वीची कामगिरी यापुढेही अशीच राहील अशी खात्री देता येत नाही हे खरे असले तरी, अनेक वर्षापासून फायद्यात असणारी कंपनी ही आपत्काळासाठी साहजिकच मजबूत राखीव निधी बाळगून असते, तसेच त्यांचा बाजारातील सहभाग ( MARKET-SHARE) , उत्तम नांव व किर्ती (BRAND AND REPUTATION) तसेच गूडविल या गोष्टी सहजासहजी नाहीशा होत नाहीत, हे ही तितकेच खरे आहे. असो.

मग अशा कंपन्या पटकन कशा शोधता येतील ?

इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतल्यास ही माहिती सहज मिळू शकते, मात्र तेवढाही त्रास न घेता अगदी रेडीमेड माहितीसाठी "गूगल फायनान्स" या मोफत सेवेचा उ पयोग करता येतो.

प्रथम सेन्सेक्समधल्या ३० वा निफ्टीमधल्या ५० कंपन्यांची यादी हाताशी असू द्या. या भारतातल्या प्रमुख आणि मोठ्या कंपन्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. किंवा आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू बनवणार्या वा सेवा पुरवणार्या कंपन्यांची नावे आठवा बरं ! यातील काही नावे तर आपल्या विशेष ओळखीची आहेत, नाही का ? उदा. हिंदुस्तान लीवर, कोलगेट, टायटन , आणि अशी कितीतरी नावे तुम्हाला आठवतील. मग निम्मे काम तर झाले. आता असे करा -

इंटरनेट उघडून http://www.google.com/finance या लिंकवर जा. गूगल फायनान्सच्या या साईटवर जगातल्या प्रमुख मार्केट्सची अद्ययावत माहिती दिलेली असते.

वरील बाजूस दिसणार्या सर्च बार मध्ये NSE:ITC असे टाईप करा आणि सर्च करा. आयटीसी कंपनीच्या शेअरचा चार्ट आणि लेटेस्ट किंमत दाखवणारे पेज उघडेल. या चार्टच्या चौकटीमध्ये वरील बाजूस डाव्या हाताला ZOOM असे लिहिले आहे, त्यापुढे 1d 5d 1m 3m 6m..... असे पर्याय आहेत, याचा अर्थ १ दिवसाचा,५ दिवसांचा, १ महिन्याचा ...असे निरनिराळ्या कालावधीचे चार्ट उपलब्ध असून त्यातील 5y अशा पर्यायावर क्लिक करा, म्हणजे आयटीसीचा ५ वर्षांचा चार्ट आपल्यासमोर उलगडेल. आता आपला माऊस या चार्टवरून मागे- पुढे सरकवल्यास त्या त्या काळातील आयटीसीची किंमत चौकटीत वरील बाजूस दिसेल. कर्सर चौकटीत एका ठिकाणी दाबून ठेवून सरकवल्यास पूर्ण चार्टही मागे पुढे सरकवता येतो. ( Thanks to Google ! )यायोगे सहजपणे गतकाळातील एखाद्या शेअरची किंमत पाहून आजपर्यंत त्यात किती वाढ झाली आहे हे पहाता येते.

याप्रमाणे निदान ५ वर्षाच्या कालावधीत स्थिरपणे वाढत गेलेल्या किंमतीचे शेअर शोधा. चार्टच्या वरील बाजूस असणार्या compare असे लिहिलेल्या चौकटीत NSE:NIFTY असे लिहून Add वर क्लिक केल्यास आपण पहात असलेल्या कंपनीच्या चार्टशी निफ्टी निर्देशांकाची तुलना करणारा चार्टही मिळेल. याचप्रकारे दोन वा अधिक कंपन्यांच्या चार्टची तुलनाही शक्य आहे. .मात्र शेअरच्या नावाआधी NSE: असे लिहायला विसरू नका. तसेच त्या त्या कंपनीचे NSE चे कोडनेम ठरलेले आहे ते अचूक लिहिल्यास पटकन हवा तो चार्ट उघडत येतो. थोड्याशा सरावाने हे सगळे सोपे व सहज होवून जाईल.

जेव्हा बाजार दिशा शोधत असतो, वातावरणात अनिश्चितता असते अशा काळात हळूहळू पण स्थिरपणे वाढ दाखवणार्या अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे मानसिक दृष्टीनेही फायद्याचे ठरते. या प्रकारची डिफेन्सीव्ह गुंतवणूक करण्यासाठी वरील प्रकारे अलिकडेच मी काही कंपन्या निवडल्या आणि त्यात गुंतवणूकही केली. गेल्या ५ वर्षांमध्ये स्थिर व उत्तम वाढ दाखवणार्या (मला आढळलेल्या) काही शेअर्सची माहिती खाली देत आहे. तीव्र तेजी व तितक्याच तीव्रतेची मंदी दाखवणार्या या ५ वर्षांच्या काळातून, तावून सुलाखून निघालेल्या या कंपन्यांची ही माहिती मी उदाहरणादाखल देत आहे, कृपया ही माहिती "गुंतवणूक सल्ला" या अर्थाने घेवू नये. कदाचित आपल्याला अधिक उत्तम कंपन्याही सापडतील, तेव्हा आपण स्वतः शोध घेतल्यास अधिक आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकाल.

१) आयटीसी- APRIL 2007 मध्ये ७५ रुपयाच्या आसपास मिळत असलेला हा शेअर आज २३६ रु. किंमत दाखवतो आहे.(पांच वर्षांत तिप्पट-यात डिव्हिडंड धरलेला नाही !)

२)हिंदुस्तान लीवर- APRIL '07 -२०० रु. आज ४०६रु. म्हणजेच दुप्पट - ( डिव्हिडंड व स्प्लिट समाविष्ट नाही)

३) -APRIL'07 -सुमारे १००० रु. , आज रु.२३८ म्हणजेच २०११ मधील बोनस/स्प्लिट धरून २३८*२० =रु. ४७६० !-जवळ जवळ पांचपट वाढ !

४) नेस्टले इंडीया-जाने.१० - सुमारे २५०० (आधीची किंमत उपलब्ध नाही), आजची किंमत ४९२० रु. म्हणजेच २ वर्षातच दुप्पट !( डिव्हिडंड समाविष्ट नाही)

५) कोलगेट -Dec.'07- रु.४००, (आधीची किंमत उपलब्ध नाही), आजची किंमत- रु.११०० ! साडेचार वर्षांत जवळजवळ तिप्पट !

६) एलआयसी हाउसिंग फायनान्स - APRIL'07-रु.१४५, आजची किंमत २६५*५(स्प्लिट) =१३२५! पांच वर्षांत चक्क नऊपट !(डिव्हिडंड समाविष्ट नाही)

७) बॅंक ऑफ बरोडा -APRIL'07- 230 रु., आजची किंमत ७८७ रु. म्हणजेच तिपटीपेक्षा जास्त !(डिव्हिडंड समाविष्ट नाही)

या सर्व कंपन्या पुढील काळातही अशीच कामगिरी करण्याची शक्यता खूपच आहे नाही का ? अजून ५ वर्षांमध्ये म्हणजे २०१७ च्या एप्रिलमध्ये जर आपणांस भरघोस फायदा झाला तर "एन्जॉय" करतांना थोडी माझी आठवण पण ठेवा बरं का !

मित्रहो, खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्भ येणे साहजिक आहे. आपल्यापैकी सर्वचजण या 'जागतिक' घसरणीमुळे कमी अधिक प्रमाणात तोटा झेलत असणार, पण असे असले तरी अशा वाईट काळामधून प्रत्येक वेळेला बाजार सावरत आलेला आहे हाच इतिहास आहे. तेव्हा सर्वप्रथम मला सांगायचे आहे कि निराश न होता वाट बघा. बाजार स्वस्त झालेला असताना खरेदी करणे मानसिकदृष्ट्या कठीण असते. मात्र काही खरेदी करता नाही आली तरी चालेल, पण हातातील 'उत्तम कंपन्यांचे शेअर्स' पडेल भावात विकण्याची चूक करू नका, कारण याच क्षणाची बाजारातले 'मोठे मासे' वाट बघत असतात.

आता मी म्हटले कि 'उत्तम कंपन्यांचे शेअर्स...'- म्हणजे नेमके काय ? उत्तम कंपन्या निवडण्याचे अनेक मार्ग आहेत, त्याप्रमाणे अभ्यास करूनच आपण त्यांची खरेदी केलेली असणार, तरीही तुमच्या मनात शंका असेल कि 'जेव्हा कधी बाजार चढेल तेव्हा माझ्याकडील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव नक्की वाढतील ना ?'

आता असे वाटण्याला कारणही तसेच आहे- २००८ मधील मंदीपूर्वी जे शेअर्स तेजीचे नवनवे विक्रम करत होते- (आठवा... पुंज लोइड, डीएलएफ, सुझलोन, युनिटेक इ. अनेक)- ते शेअर्स काही वाईट

कंपन्यांचे नव्हते, मात्र २००९ मध्ये बाजार सावरला गेल्यानंतर आणि पुन्हा सेन्सेक्स २१००० झाल्यानंतरही हे काही शेअर्स पूर्वीची तेजी दाखवू शकले नाहीत. आजही यात गुंतवणूक असलेले माझे अनेक मित्र मला माहीत आहेत.

तर हे सर्व सांगायचा हेतू हा कि ' सार्वत्रिक मंदीमध्ये आपलेकडील शेअर्स घसरले तर त्याला उपाय नसतो आणि दुःखही तितके होत नाही, मात्र बाजार चढत असतानाही 'फक्त आपलेकडील' शेअर्स

वाढत नसतील तर तीव्र दुःख होते...' मग सर्व शेअरबाजाराचाच राग येवू लागतो आणि अनेकजण निराशेने पुन्हा बाजाराचे तोंड न बघण्याचे ठरवितात. - माझे आजचे लिखाण अशाच मित्रांसाठी आहे.

आता बाजार चढतो म्हणजे नक्की काय होते? आपल्याकडे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांच्या आधारे वध-घट ठरवली जाते. सेन्सेक्समध्ये BSE मधील निवडक ३०, व निफ्टीमध्ये NSE मधील

निवडक ५० शेअर्सच्या भावांनुसार निर्देशांक ठरवला जातो, हे आपल्याला माहीत असेलच. यात प्रत्येक कंपनीला एक ठराविक वेटेज (वजन) दिलेले असते. उदा. रिलायन्स, ओएन्जीसी, कोल इंडीया या काही

मोठ्या आकाराच्या कंपन्यांना जास्त वेटेज असते. साहजिकच जास्त वेटेज असलेल्या कंपन्याच्या भावामधील चढ-उताराचा निफ्टी वा सेन्सेक्सवर अधिक परिणाम होतो, आणि कमी वेटेज असलेल्या

शेअर्सच्या भावामधील चढ-उताराचा निर्देशांकावर तितकासा परिणाम होत नाही. याचाच परिणाम असा होतो कि, काही प्रमुख कंपन्यांमध्ये खरेदी होवून सेन्सेक्स वा निफ्टी वाढलेला तर दिसतो, मात्र तरीही कमी वेटेज असलेले काही शेअर्स न वाढता तसेच राहिलेले किंवा उतरलेलेही असू शकतात. आता बाजारातले 'मोठे मासे' कधी कुठल्या शेअर्समध्ये खरेदी करतील हे आपल्याला नेहेमीच कळू शकत नाही. आणि म्हणूनच सामान्य गुंतवणूकदार निराशेचा धनी होतो

मग यावर उपाय काय? यावर एक 'ढोबळ उपाय' असा कि जास्त वेटेज असलेल्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक ठेवणे. (सेन्सेक्स मधील लेटेस्ट वेटेज ची यादी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.) पण मग काही उदाहरणे अशीही आहेत कि एखादी जास्त वेटेज असलेली कंपनी, उदा. रिलायन्स गेले २ वर्षभर बाजाराच्या तुलनेत पडेल भाव दाखवत आहे. आता काय करावे ?

मग चढत्या बाजारात तरी निर्देशांकानुसार नक्की चढत जाईल असा कुठला शेअर असेल का? - तर मित्रांनो,... होय, आहे...! त्याचीच माहिती आज घेवूया.

बेन्चमार्क या असेट मेनेजमेंट कंपनीने २००८ च्या जानेवारीमध्ये भारतातील Nifty BeES या पहिल्या ETF (एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड) ची स्थापना केली.

हा एक शेअर नसून, ETF असला तरी तो NSE वर अगदी एखाद्या शेअरप्रमाणेच खरेदी अथवा विक्री करता येतो. म्हणजेच बाजारात कधीही NiftyBeES चे अगदी एक युनिटही आपण खरेदी वा विक्री करू शकतो, कितीही काळ 'होल्ड' करून ठेवू शकतो.-

प्रत्येक NiftyBeES युनिट हे रु.१० एवढ्या दर्शनी मूल्याचे(Face Value) असून बाजारातील त्याची किंमत ही निफ्टी निर्देशांकाच्या सुमारे एक दशांश (१/१०) एवढी असते. (किंवा आपण येथे 'युनिट' ऐवजी 'शेअर' म्हणायलाही काही हरकत नाही, कारण आपल्या दृष्टीने हा एखाद्या शेअरप्रमाणेच असून त्याप्रमाणेच बाजारात त्याचे व्यवहार होतात) म्हणजेच आजची निफ्टी इंडेक्सची किंमत ५००० असेल तर या NiftyBeEs ची बाजारातील किंमत साधारणपणे ५०० रु.च्या आसपास असते. जसा बाजार किंवा निफ्टी वर-खाली होइल तसाच हाही स्वस्त आणि महाग होत असतो, किंवा असेही म्हणता येइल कि निफ्टीवरच हा आधारभूत असतो.

NSE वर याचा सिम्बोल 'NIFTYBEES'असा आहे, तर BSE वर याचा 'टिकर नं.' 590103 आहे. मात्र याचे व्यवहार NSE वरच करावेत, कारण BSE वर याचे व्यवहार अतिशय मर्यादीत होतात म्हणजेच

Volume कमी असल्याने Bid price - Ask price मध्ये खूप तफावत राहून त्यामुळे योग्य किंमत न मिळण्याची शक्यता असते. एनएसई वर मात्र भरपूर Volume असतो. निफ्टीबीझ चे फायदे -

# इतर कोणत्याही शेअरप्रमाणे आपण आपल्या ब्रोकरला सांगून सहजपणे खरेदी वा विक्री करू शकतो.

# निफ्टीच्या म्हणजे बाजाराच्या चढउतारानुसार हा वर-खाली होत असल्याने Short Term वा Long Term दोन्ही प्रकारच्या ट्रेडर्सना सोयीस्कर.

# निफ्टीच्या किंमतीच्या एक दशांश किंमतीस मिळत असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना सहज घेता येतो. (निफ्टी फ्युचर्सचे व्यवहार हे तुलनेने अधिक महाग असून Risky ही असू शकतात)

# याची किंमत ही निफ्टीमधील ५० शेअर्सच्या किंमतीवर आणि त्यांच्या Demand-Supply वर थेट अवलंबून असून कोणा फंड मेनेजरच्या कामगिरीवर अवलंबून नसते.

# निफ्टीबीझचा एक शेअर घेणे म्हणजे भारतातल्या ५० प्रमुख कंपन्यांमध्ये एकाचवेळी गुंतवणूक करण्यासारखे आहे. यामुळे सगळा पैसा एकाच कंपनीमध्ये वा सेक्टरमध्ये गुंतवला जात नाही, आणि भांडवल नष्ट होण्याचा धोका रहात नाही.

वरील सर्व फायद्यांमध्ये थोडासा तोटा असा आहे कि निफ्टीबीझ हा इतर शेअर्सच्या तुलनेत मंद हालचाल करतो, कारण तो ५० शेअर्सशी निगडीत आहे. म्हणजेच निफ्टी १०० पोइन्टने हालेल तेव्हा निफ्टीबीझ साधारणपणे १० पोइन्टने हालेल, पण याला तोटा न म्हणता मी स्थिरता आणि सुरक्षितता म्हणेन !

यापूर्वी 'निफ्टी पी/ई' आणि त्याआधारे करता येणारी गुंतवणूक याविषयी मी येथे लिहिलेले आपणास आठवत असेलच. मग आता जेव्हा 'निफ्टी पी/ई रेशो' स्वस्त होवून गुंतवणूक करावीशी वाटेल तेव्हा नक्की कुठला शेअर घ्यावा हा प्रश्न पडायला नको ... निफ्टीबीझ घ्या आणि बाजार वाढेल तेव्हा हमखास फायद्याची हमी बाळगा ! शेअरबाजारात कधी कोणी फायद्याची हमी देत नसतो, मात्र 'चढत्या बाजारात तरी' नक्कीचा फायदा याद्वारे मिळवा आणि शेअरबाजाराचे तोंड पुन्हा पहाणार नाही असा निर्णय घेतला असेल तर पुन्हा एकदा विचार करा ....!

मित्रहो, वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना नेहमीइत केच समाधान होत आहे. हा माझा प्रयत्न वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.

आजची ही पोस्ट , "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" या लेखमालेचा पूढचा भाग म्हणूनही लिहीत आहे.

तांत्रिक विश्लेषणाची ओळख :भाग १३

मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये वापर-

टेक्निकल चार्ट पहाताना मूव्हींग एवरेजची किंमत कशी काढतात ते आपण यापूर्वी पाहिले आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचे त्याचा प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा वापर करतात हे जाणून घेणे आहे.

मूव्हींग एवरेजचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे एखाद्या शेअरची वा कमोडिटीची एखाद्या ठराविक काळापूरती सरासरी किंमत होय. हा ठराविक काळ किती असावा हे अर्थातच आपण ठरवायचे आहे.

गूगल वा याहू फायनान्स या साईटवर गेल्यास असे इन्टरएक्टीव्ह चार्ट्स उपलब्ध असतात.त्यामध्ये आपण इन्ट्राडे, ५ दिवस, महिना, ३महिने, ६ महिने, वर्ष, ५ वर्षे इ. विविध कालावधी निवडू शकतो.एकदा का आपला कालावधी नक्की झाला कि मग त्या चार्ट मध्ये किती पिरीअडची मूव्हींग एवरेजची रेषा काढायची हे ठरवावे लागते.

यामध्ये १० पिरीअड SMA आणि ३० पिरीअड EMA अशा दोन मूव्हींग एवरेजेस काढल्या आहेत.अर्थातच यातील १०SMA ही वेगात हालचाल करणारी आहे आणि ३०EMA ही त्यामानाने कमी हालचाल दाखवते किंवा फारसे चढ-उतार दाखवत नाही. अशा प्रकारे दोन वेगळ्या प्रकारे वागणार्या लाईन्स घेतल्याने नक्की ट्रेन्ड काय आहे, तसेच तो रिव्हर्स होतो आहे का हे ओळखता येते. सातत्याने वरखाली होणार्या शेअरच्या भावातील तात्पुरत्या चढ-उतारामुळे होणार्या दिशाभूलीवर उपाय म्हणून मूव्हींग एवरेज या कल्पनेचा जन्म झाला. थोडक्यात मूळ किंमतीच्या ग्राफमधील विचित्र वळणे टाळून त्याचेच एका गुळगुळीत (Smooth) रेषेमध्ये रुपांतर करण्यात आले

आता अशा दोन वेगवेगळ्या मूव्हींग एवरेजेस पैकी वेगवान असलेली म्हणजेच १०SMA ही जेव्हा ३०EMA या रेषेला छेद देते तेव्हा ट्रेन्ड रिव्हर्स झाला असे ढोबळमानाने समजले जाते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा १०SMA ने ३०EMA ला खालून वरच्या दिशेस छेद दिला तेव्हा डाऊनट्रेन्ड संपून अपट्रेन्ड सुरू झाला असे समजतात.त्यानंतर मात्र जोपर्यंत पुन्हा वरून खालच्या दिशेस छेदले जात नाही तोपर्यंत अपट्रेन्ड कायम आहे असे समजण्यात येते.

म्हणजेच अपट्रेन्ड सुरू झाल्यावर खरेदी करून पुन्हा ट्रेन्ड रिव्हर्सल होईपर्यंत होणारा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. जोपर्यंत १०SMA ही ३०EMA च्यावर राहिली आहे, तोपर्यंत Long position (खरेदी) चा विचार करावा आणि जर १०SMA ही ३०EMA च्या खाली असेल तर Short positions (विक्री अथवा शोर्टसेलींग) चा विचार करावा. या पद्धतीने आपले निर्णय योग्य ठरण्याची शक्यता वाढते. यापेक्षा अधिक सोपे काही असेल का ?

मात्र म्हणूनच कोणतीही पद्धत शेअरबाजारात १०० टक्के कधीच बरोबर नसते याचीही जाणीव ठेवायला हवी. मात्र अधिक अचूक निदान करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पिरीअडच्या SMA व EMA चा वापर करून बघा. कुठले कोम्बिनेशन अधिक अचूक परिणाम देते तसेच आपल्या स्वत:च्या ट्रेडींग-स्टाईल ला चपखल बसते ते प्रत्येकाने पडताळून पहाणे गरजेचे आहे. तसेच डे-ट्रेड साठी इन्ट्राडे चार्ट वापरावा आणि शोर्ट टर्म साठी ५ दिवस,१ महिना, ३ महिने तसेच ६ महिने कालावधीचे चार्ट निवडून त्यावर विविध पिरीअडच्या मूव्हींग एवरेजेस कशा काम करतात हे पहायला हवे. कुठल्या पद्धतीने कमीतकमी चूकीचे सिग्नल (WHIPSAW) निर्माण होतात ते पडताळून ती पद्धत सातत्याने स्टोपलोस सहीत वापरल्याने फायद्याचे प्रमाण नक्कीच वाढेल.

१० व २६SMA , ८ व ३४EMA तसेच, २० व ५०SMA अशी विविध कोम्बिनेशन्स ट्रेडर्समध्ये लोकप्रिय आहेत. यात खालील गोष्टी नियम म्हणून पाळाव्यात-

१) छोट्या पिरीअडची लाईन ही मोठ्या पिरीअडच्या लाईनपेक्षा वर असेल तरच खरेदीचा विचार.
२) दोन्ही एवरेजेस एकमेकांच्या फार जवळ नसाव्यात.
३) दोन्ही एवरेजेस या वरचे बाजूस जाणार्या म्हणजे चढत जाणार्या असाव्यात.

याव्यतिरिक्त आणखी एक सोपी व परिणामकारक पद्धत म्हणजे २१ किंवा ३४ या पिरीअडची एकच EMA लाईन काढून जेव्हा शेअरची किंमत ही EMA लाईनला खालून वरच्या दिशेस छेद देइल तेव्हा खरेदी व याउलट वरून खालच्या दिशेस छेद देइल तेव्हा शोर्टसेल करतात.

अशा प्रकारच्या ट्रेडींग मध्ये निर्णयाला अधिक बळकटी यावी म्हणून २०० SMA चा खालील प्रमाणे प्रभावी वापर करता येतो.- २०० SMA ही लाईन काढून बुलीश विभाग आणि बेअरीश विभाग असे दोन भागांची कल्पना केली जाते. २००SMA ही मोठ्या पिरीअडची असल्याने ही फार चढ-उतार दाखवत नाही, या लाईनच्या खाली बेअरीश विभाग समजून जोपर्यंत शेअरची किंमत या विभागात आहे, तोपर्यंत वरील मूव्हींग एवरेजेस च्या कोम्बिनेशनने दिलेले विक्रीचे सिग्नल फक्त विचारात घेतले जातात. याउलट २००SMA च्या वरच्या बाजूस म्हणजे बुलीश विभागात जर शेअरची किंमत असेल तर फक्त खरेदी सिग्नलच विचारात घेतले जातात.

२०० SMA रेषा ही कोणत्याही चार्टचे अविभाज्य अंग असावी असे महत्व तीला आहे.सातत्याने निरीक्षण कराल तर असे दिसून येइल कि शेअरची किंमत ही अनेक वेळेला या महत्वाच्या रेषेला स्पर्श करून परत फिरते.

WISH YOU ALL HAPPY TRADING....!

ब-याच दिवसांपासून काही वाचकांनी कॉल व पुट याविषयी माहिती देण्याची विनंती येथे केली होती. शेअरबाजारात गुंतवणूकीला सुरुवात करताना साधारणपणे म्युचुअल फंडापासून सुरुवात करून मग इक्विटी, ऑप्शन्स व नंतर शेवटी फ्युचर्स अशा क्रमाने जाण्याचा सल्ला दिला जातो. कमीतकमी धोका पत्करत पुढे जाण्याच्या दृष्टीने हा क्रम ठीक असला तरी बाजाराविषयीची समज व वाढत जाणारे भान या दृष्टीने ऑप्शन्स हे शेवटी येतात असे मला वाटते.

माझ्या मते इक्विटी, फ्युचर्स आणि निरनिराळ्या ट्रेडींग स्ट्रेटेजीज यांचा काही वर्ष भलाबुरा अनुभव घेतल्यावर, बाजाराचा एक वेगळा अंदाज येत जातो, तसेच अशी एक स्थिती येते कि बाजाराच्या शॉर्टटर्म मूव्हमेन्टविषयी एक प्रकारची उदासीनता वा स्थितप्रज्ञता येत जाते. बाजाराची उसळी वा तीव्र घसरण यांचे विशेष काही वाटेनासे होते. याचा अर्थ असा नव्हे कि अशा अनपेक्षीत हालचालींमुळे नुकसान होत नाही, मात्र अशा हालचाली गृहीत धरून, "सरावाने, अनुभवाने कुठल्याही परिस्थितीत नियमीतपणे फायदा उठवता आला तर किती बरे !' असे काहीसे विचार मनात येवू लागतात. त्यासाठी काही स्पेशल स्ट्रॅटेजी शोधण्याचा मन प्रयत्न करू लागतं ....

-मित्रांनो, मग हीच ती वेळ असते- "ऑप्शन्स.." या असंख्य पर्याय, अविरत संधी असणा-या अनोख्या क्षेत्राची ओळख करून घेण्याची !

ऑप्शन्स या एका मोठ्या विषयाला हात घालताना - मी अशी ओळख कितपत नीटपणे करून देवू शकेन याची मनात शंका आहे, मात्र आपणां सर्वांच्या पाठिंब्यावर हळू हळू हे जमेल असा विश्वासही आहे.

हे एक चांगले काम असल्याने ते सुरु करायला मुहुर्ताची वाट न पहाता आजच ते सुरु करत आहे. चांगले काम असे म्हणण्याचे कारण शेअरबाजारात ख-या अर्थाने एक कसलेला ट्रेडर व्हायचे असेल तर ऑप्शन्स समजून घेवून त्यामध्ये प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. असे प्राविण्य मिळवलेत कि उतारवयात, हातपाय थकल्यावरही तुम्ही नियमीत कमाई करू शकाल ! एवढेच नव्हे तर तुमचा नातु तुम्हाला सल्ला विचारत राहील, रिटायर्ड असलात तरी कमावते असाल, आणि घरातला तुमचा मान कधीही कमी होणार नाही !

असो. प्रथम ऑप्शनची व्याख्या काय आहे हे बघुन मग सविस्तर माहिती घेवूया.

ऑप्शनची व्याख्या – ऑप्शन म्हणजे एक असे कॉन्ट्रॅक्ट वा करार आहे, कि जे लिहून देणारा (Seller or Writer) हा, ते कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणा-यास (Buyer) एखादी ठराविक वस्तू किंवा मालमत्ता (Underlying), ठराविक किंमतीत

(Strike price or Exercize price), ठराविक मुदतीपर्यंत, (कॉल ऑप्शनच्या बाबतीत) खरेदी करण्याचा, वा (पुट ऑप्शनच्या बाबतीत) विक्री करण्याचा हक्क(Right) देतो, मात्र कॉन्ट्रॅक्टनुसार तशी खरेदी/विक्री करण्याचे बंधन (Obligation) मात्र खरेदी करणा-यावर नसते.

या हक्काच्या(Right) बदल्यात असे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट लिहून देणा-यास (Writer) ते खरेदी करणा-याकडून (Buyer) काही रक्कम (Premium) अदा केली जाते आणि बदल्यात ते कॉन्ट्रॅक्ट पाळण्याचे बंधन मात्र विक्री करणा-यावर रहाते.

या व्याख्येवरून सारे काही स्पष्ट होणार नाही, म्हणून एक उदा. घेवून मी नंतर स्पष्ट करेनच, मात्र तूर्त एवढेच लक्षांत घ्या कि - ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणाराला प्रिमियम भरावा लागतो पण त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणे बंधनकारक नसते, याउलट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट विक्री करणारा हा प्रिमियमची रक्कम मिळवत असतो, मात्र त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट पाळणे बंधनकारक असते.

ऑप्शन्सचे वेगळेपण-

१) ऑप्शन्स हे मुख्यत्वे हेजींगसाठी वापरले जात असले तरी एक स्वतंत्र ट्रेडींग स्ट्रॅटेजी म्हणूनही वापरता येतात.

२) आपले नुकसान मर्यादीत ठेवण्याची उपजतच सोय असणारे ऑप्शन्स हे इन्स्ट्रुमेन्ट आहे. म्हणजे वेगळा स्टॉपलॉस लावण्याची गरज (ऑप्शन्स खरेदी करणा-यांना) पडत नाही.

३) अमर्यादीत फायदा तसेच अमर्यादीत तोटा अशा दोन्ही वैशिष्ट्यांमुळे योग्य काळजी घेतल्यास अफाट संधी.

४) बाजाराची दिशा कुठलीही असली तरी फायद्याच्या संधी नेहमी उपलब्ध.

५) फ्युचर्सच्या तुलनेत कमी मार्जिनमध्ये इंडेक्स ट्रेड करण्याची क्षमता.

६) ऑप्शन्सची विक्री (Writing) करून थोडा पण नियमीत फायदा मिळवण्याची संधी.

आता एका उदाहरणाने ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते नीट समजून घेवूया. समजा मला एक टीव्ही खरेदी करायचा आहे. मी चौकशीसाठी एका शोरूममध्ये जातो आणि एक ठराविक मॉडेल सिलेक्ट करतो. त्याची किंमत रु.२०,००० आहे, मात्र येत्या काही दिवसांत टीव्हीच्या किंमती उतरणार असल्याचे मी ऐकले आहे, त्यामुळे मी लगेच खरेदी न करता विक्रेत्याला सांगतो कि मी थोड्या दिवसांनी येतो आणि टीव्ही खरेदी करून घेवून जातो. त्यावर तो विक्रेता म्हणतो कि साहेब, थोड्या दिवसांनी आलात तर चालेल, मात्र हे मॉडेल तेव्हा उपलब्ध असेलच असे नाही तसेच किंमती वाढल्या तर तुम्हाला त्या दिवशी असलेली किंमत द्यावी लागेल. मला तर हेच मॉडेल आवडले आहे आणि खरेदी तर आता करायची नाही, तर उतरलेल्या किंमतीत नंतर करायची आहे, मात्र विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार किंमती वाढण्याचीही शक्यता आहे. ;-) त्यामुळे मी विचारात पडलो.

शेवटी तो विक्रेता एक पर्याय माझ्यापुढे ठेवतो तो असा - या महिना अखेरपर्यंत तो माझ्यासाठी हे मॉडेल याच किंमतीत राखून ठेवायला तयार आहे, मात्र त्याबदल्यात मी हमी म्हणून त्याला १००० रु. द्यावेत. म्हणजे मी आत्ता फक्त १०००रु. भरून या महिनाअखेर पर्यंत ते मॉडेल त्याच किंमतीत खरेदी करण्याचा हक्क विकत घ्यायचा आहे !

मग असे १०००रु.भरून मी त्याच्याकडून करार करून पावती घेतली. त्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत कधीही मी जर त्याच्याकडे गेलो, तर त्याने दरम्यानच्या काळात टीव्हीच्या किंमती अगदी कितीही वाढल्या असल्या तरी ते मॉडेल मला २०,०००रु. मध्येच देणे त्याच्यावर बंधनकारक आहे. म्हणजे असा करार केल्याने २२,०००रु.चा टीव्ही मला २०,०००रु.तच मिळणार आहे. याउलट जर मी त्या मुदतीत त्याच्याकडे गेलो नाही तर सदर हमीचे १०००रु. हे त्याला मिळणार आहेत

पण समजा महिनाभरात टीव्हीच्या किंमती २०००रु.ने उतरल्या तर? तर मी त्याच्याकडे जायचे कारणच उरणार नाही, कारण दुस-या दुकानातून मला तो टीव्ही १८,०००रु.तच घेता येइल. म्हणजे त्याला दिलेले हमीचे १०००रु. वजा जावूनही मला १०००रु. फायदा मिळेल.

आता एक शक्यता विचारात घ्या- समजा महिना पुरा होण्याआधीच टीव्हीच्या किंमती २०००रु.ने वाढल्या आहेत, पण दरम्यान मला टीव्ही घ्यायचा विचार काही कारणाने रद्द करावा लागला तर ? अशा वेळी १०००रु.हमी रक्कम भरून मी मिळवलेला २०,०००रु.त टीव्ही खरेदीचा हक्क फुकट जाईल कि नाही ?

पण दरम्यान माझ्या ओळखीच्या एका माणसालाही टीव्ही घ्यायचा असल्याचे मला कळल्याने मी ती हमीची पावती त्याला थोड्या कमी पैशात उदा. ७००रु.त विकून टाकतो. आता ती पावती घेवून त्या हमीनुसार तो माणूस त्या शोरूममध्ये तो २२,०००रु.चा टीव्ही २०,०००रु. मध्ये घेवू शकेल ! अशा प्रकारे त्या माणसाचे १३००रु. वाचले, तर माझ्या हमी रकमेपैकी निदान ७००रु. मला परत मिळाले.

आणखी काही शक्यता- समजा मला टीव्ही घेणे रद्द करावे लागले आणि दरम्यान त्या टीव्हीच्या बाजारातील किंमती हळूहळू उतरल्या किंवा स्थिर राहिल्या तर ? म्हणजे आता या स्थितीत माझ्या हमी पावतीला ७००रु.तही कोणी खरेदी करणार नाही. मला ती कमी किंमतीत विकावी लागेल. म्हणजेच मुळात १०००रु. च्या हमी पावतीची बाजारातील किंमत ही, दिवसागणिक गि-हाईक मिळण्याची शक्यता कमी होत गेल्याने कमी कमी होत जावून महीना अखेर शून्य होइल !

वरील उदाहरण नीट वाचल्यावर आता ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची सुरुवातीला दिलेली व्याख्या पुन्हा एकदा नीट वाचा बरं ! आता मला खात्री आहे कि ऑप्शन ही संकल्पना एव्हाना नक्की आपल्या ध्यानात येवू लागली असेल. तसे असेल तर पटापट या ब्लॉगला LIKE करा बरं !!

यानंतर आणखी सविस्तर स्पष्टीकरण, तसेच कॉल आणि पुट म्हणजे काय हे बघुया पुढील पोस्टमध्ये !

टेक्निकल अनालिसिस(तांत्रिक विश्लेषण)-भाग १
तांत्रिक विश्लेषणाची ओळख- शेअरबाजारात एखाद्या शेअरचे किंवा निर्देशांकाचे(INDEX)किंवा कमोडिटीचे गुंतवणूकीविषयीचा निर्णय घेण्यासाठी य़ोग्य ते मुल्यमापन करण्याच्या दोन मुख्य आणि प्रसिद्ध पद्धती आहेत-त्या म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस.
फंडामेंटल अनालिसिस करताना एखाद्या शेअरचे मुल्यमापन करण्यासाठी त्या कंपनीचा सर्वांगानी जसे कि-भांडवल,नफातोटा,आगामी व्यवसाय संधी,त्या संबंधीत सेक्टरमधील हालचाली,सरकारच्या धोरणांचा संभाव्य परिणाम,बाजारातील शेअररुपी भांडवल,राखीव निधी आणि मेनेजमेंटची कुवत अशा अनेक अंगानी विचार केला जातो. तांत्रिक विश्लेषणात मात्र पूर्णपणे वेगळ्या प्रकारे मुल्यमापन केले जाते-यात वरील कुठल्याही बाबीचा विचार न करता त्या शेअरच्या अथवा कमोडिटीच्या बाजारातील किंमतीत झालेल्या चढउतारांचा आलेखाच्या(CHARTS) आधारे अभ्यास केला जातो.
हा अभ्यास करताना अनेक साधने(TOOLS)वापरली जात असली तरी बाजारातील मागणी आणि पुरवठा याच बाबींचा विचार त्या शेअरच्या आगामी वाटचालीचा अंदाज बांधण्यासाठी केला जातो.जरा वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे तांत्रिक विश्लेषण हे भूतकाळातील किंमती व उलाढाल (VOLUME)यांचा आलेखाच्या आधारे अभ्यास करून बाजाराचा कल किंवा भावना (SENTIMENT)ओळखण्याचा आणि त्याआधारे भविष्यातील संभाव्य चढउतार(PATTERNS)ठरविण्याचा प्रयत्न करत असते.
आपण जर या तांत्रिक विश्लेषणाचे फायदे आणि मर्यादा ओळखून त्यात उपलब्ध असलेली विविध साधने आणि त्यांचा वापर करण्याचे कौशल्य मिळवल्रे तर आपण नक्कीच एक अधिक चांगले ट्रेडर वा इन्वेस्टर होऊ शकता! तांत्रिक विश्लेषण करण्याच्या अनेक पद्धती आहेत-काहीजण आलेखाकृतींचा (CHART PATTERNS)अभ्यास करतात तर काहींचा भरवसा विविध चिन्हे वा आंदोलके(INDICATORS AND OSCILLATORS)यांनी मिळणार्या इशार्यांवर(SIGNALS)असतो,तर बरेचजण अशा दोन किंवा तीन साधनांचा एकत्रित वापर करुन अचुकता वाढविण्याचा प्रयत्न करतात. कसेही असले तरी तांत्रिक विश्लेषक हा एखाद्या शेअरच्या मुल्याला(VALUATION) महत्व न देता भूतकाळातील माहितीवर आधारित अशा त्याच्या भविष्याचा वेध घेत असतो.
या तांत्रिक विश्लेषणाची काही मुलभूत गृहितके वा आधारतत्वे आहेत-
गृहितक १) बाजारात भूतका्ळातील (व भविष्यातीलही सर्व संभाव्य) घटनांचे प्रतिबिंब पडलेले असतेच. तांत्रिक विश्लेषणावर होणारी एक नेहमीची टीका वा आरोप असा आहे कि त्यात फक्त किंमतीतील चढ-उताराचा अभ्यास केली जातो, मात्र कंपनीविषयक माहितीचा वा घटनांचा त्यात मुळीच समावेश नसतो.असे असले तरी तांत्रिक विश्लेषणात हे गृहीत धरलेले असते कि-कोणत्याही वेळेस त्या विशिष्ट शेअरच्या किंमतीवर त्या कपनीच्या फंडामेंटल्सचा तसेच कंपनीविषयक सर्व इतर माहितीचा व घटनांचा एवढेच नव्हे तर बाजारातील त्या कंपनीविषयीच्या बातम्या व भावनांचा प्रभाव वा परिणाम झालेलाच असतो.तेव्हा नव्याने त्या सर्व माहितीचा वेगळा अभ्यास करण्याची गरजच नसते.अशा प्रकारे मग फक्त उरतो तो त्या शेअरच्या बाजारातील किंमत-जी मागणी व पुरवठ्यावर आधारित असते-तीचाच अभ्यास!
गृहितक २) बाजारातील किंमत ही काही ठराविक दिशेने वा कलाने(TRENDS) वाढत वा कमी होत असते. तांत्रिक विश्लेषणात असे मानले जाते कि किंमत ही ठराविक दिशेने वा पद्धतीने,कलाने वाढते वा कमी होते-याचा अर्थ असा कि एकदा हा कल (TREND)तयार झाला कि मग भविष्यात त्याच्या आधारानेच किंमत बदलण्याची जास्त शक्यता असते. तांत्रिक विश्लेषणातील बहूतेक पद्धती(STRATEGY)या गृहीतकावरच आधारित आहेत.
गृहितक ३) इतिहासात पुनरावृत्ती करण्याची प्रवृत्ती असते- म्हणजेच किंमतीतील चढ-उताराच्या बाबतीत अशी पुनरावृत्ती होत असते.अशा पुनरावृतीला अर्थातच बाजाराची म्हणजेच लोकांची मानसिकता कारणीभूत असते.निराळ्या शब्दात- बाजारात व्यवहार करर्णारे लोक हे किंमतीमध्ये होणार्या ठराविक हालचालींना ठराविक प्रकारे प्रतिसाद(REACTION) देतात म्हणजेच खरेदी वा विक्रीचे निर्णय घेतात. विश्लेषक ज्या आलेखाकृतींचा (CHART PATTRNS) अभ्यास करतात त्या १०० पेक्षा जास्त वर्षापासून वापरल्या जात आहेत याचे कारण-एवढ्या काळामध्ये त्यात पुन्हा पुन्हा तयार झालेले किंमतीचे PATTERNS हेच आहे.
तांत्रिक विश्लेशण हे फक्त शेअरमधील व्यवहारासाठीच वापरले जाते असे नाही तर निर्देशांक,फ्युचर्स(वायदेबाजार),कमोडिटीज(धातू वा कडधान्ये इ.),परकिय चलन अशा सर्वच व्यवहारांमध्ये याचा नियमीत वापर होतो.
तांत्रिक विश्लेषणामागची अशी पार्श्वभूमी व प्राथमिक माहिती समजून घेतल्यावर आता नेमक्या कशा प्रकारे काम करते वा वापरले जाते ते बघताना त्या्ची फंडामेंटल अनालिसिस बरोबर तुलना होणे स्वाभाविक आहे(काही जणांच्या मते अशी तुलना करणे चुकीचे आहे) त्यासंबंधी आपण पुढील भागात बघुया.
तांत्रिक विश्लेषण-भाग २
तांत्रिक विश्लेषण आणि फंडामेंटल(मुलभूत) विश्लेषणातील फरक आपण याआधी बघितले कि तांत्रिक विश्लेषण हे एखाद्या शेअरच्या किंमतीतील हालचालीचा आढावा घेते असते आणि त्यायोगे त्याच्या भविष्यातील किंमतीचा अंदाज बांधत असते तर मुलभूत विश्लेषण हे त्या कंपनीच्या आर्थिक व व्यावसायिक परिस्थितीचा अभ्यास करत असते. या दोघांतील नेमका फरक,तांत्रिक विश्लेषणावर असणारे आक्षेप आणि या दोघांचाही एकत्रित अभ्यास करून काढले जाणारे निष्कर्ष याविषयी माहिती घेउया. अगदी प्राथमिक पातळीवर तांत्रिक विश्लेषक हा आपल्या अभ्यासाची सुरुवात ही चार्टस पासून करतो तर मुलभूत विश्लेषक हा आर्थिक ताळेबंद,CASH FLOW आणि उत्पन्नविषयक माहितीपासून.म्हणजेच मुलभूत विश्लेषक हा त्या कंपनीत असलेली वा दडलेली सूप्त VALUE,किंवा मूल्य शोधत असतो. या पद्धतीत एक साधा विचार असतो कि जर या दडलेल्या मुल्यापेक्षा कंपनीची बाजारातील किंमत कमी असेल तर ती एक उत्तम गुंतवणूक समजली जाते.हे या पद्धतीचे अगदीच साधारण स्वरूप म्हणून सांगितले कारण आर्थिक ताळेबंदांपलिकडेही बरेच काही मुलभूत विश्लेषणात पाहिले जाते. तांत्रिक विश्लेषक हा अशा प्रकारच्या कंपनीच्या अभ्यासाला महत्व देत नाही कारण हे सर्व घटक बाजारातील किंमतीत परावर्तित झालेले असतातच आणि चार्टस मध्ये ती माहिती असतेच असे तो मानतो. मुलभूत विश्लेषक हा आपला अभ्यास काही वर्षांच्या काळाकरिता म्हणजेच तुलनेने जास्त कालावधीकरिता (Period) करतो तर तांत्रिक विश्लेषक हा अगदी आठवडे, दिवस वा काही मिनिटांपर्यंतच्या कमी वेळाकरिता आपला अभ्यास करतो वा अंदाज बांधू शकतो. या अशा अगदी वेगळ्या कालावधीचा उपयोग केल्याने या दोन पद्धतींद्वारे केलेल्या गुंतवणूकीत अगदीच मोठा फरक दिसून येतो. मुलभूत विश्लेषणाने काढलेली कंपनीची सूप्त किंमत किंवा VALUE बाजारात प्रत्यक्ष दिसून येण्यासाठी मोठा काळ जाण्याची शक्यता असते तेव्हा या प्रकारच्या गुंतवणूकीला VALUE-INVESTING म्हटले जाते आणि बाजारातील तात्पुरती वरखाली होणारी किंमत ही चूकीची समजून काही(वर्षेसुद्धा) काळानंतर बाजारात खरी किंमत दिसून येइल असे मानले जाते.(अशा प्रकारच्या VALUE INVESTING चा वापर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार"वोरेन बफेट" करत असतो.) कंपनीचे ताळेबंद हे दर तीन महिन्यानी प्रसिद्ध होत असल्याने,तसेच कंपनीचे प्रतिशेअर उत्पन्न हे दररोज बदलत नसल्याने हे आकडे वापरण्यासाठी मुलभूत विश्लेषकाला तोपर्यंत थांबावे लागते.हे सर्व आकडे त्या कंपनीच्या व्यवसायाविषयी माहि्ती देतात पण मेनेजमेंटने घेतलेले निर्णय,नवे मार्केटींग फंडे,कच्च्या मालाच्या पुरवठयाचे नवे स्त्रोत वगैरे अमलात येऊन त्याचे परिणाम दिसून यायला काही काळ जावा लागतो. आता याउलट तांत्रिक विश्लेषण हे त्यामानाने थोडक्या काळाकरता वापरता येते एवढेच नव्हे तर सूप्त किंमतीमध्ये केलेल्या गुंतवणूकीपेक्षा, ट्रेड (व्यापार किंवा सट्टा,) याकरता ते वापरले जाते. येथेच या दोन पद्धती अगदी वेगळ्या म्हणजे गुंतवणूक (INVESTMENT) आणि व्यापार(TRADING) या दोन भिन्न दृष्टीकोनात विभागल्या जातात आणि तशा त्या वापरल्याही जातात. गुंतवणूकदार हा एखादा शेअर विकत घेतो ते त्या शेअरची किंमत योग्यरित्या वाढून सूप्त मुल्याएवढी होइल या अपेक्षेने तर व्यापारी किंवा ट्रेडर हा आजच्या उपलब्ध किंमतीला तो शेअर घेऊन शक्य तेवढ्या नजिकच्या भविष्यात तो वाढीव किंमतीला दुसर्याला विकून टाकण्याचा इरादा ठेवूनच. तांत्रिक विश्लेषणाचे काही टिकाकार त्याला काळी जादू असे संबोधत असले तरी सर्व मोठे ब्रोकर टेक्निकल अनालिसीसचा आधार घेतात हे निखळ सत्य आहे. तांत्रिक विश्लेषण हे भूतकाळातील माहितीवर आधारित असल्याने त्यावर भविष्यातील घटना न विचारात घेण्याचा आरोप होतो तर मुलभूत विश्लेषणात बाजारातील चढ-उतारामुळे उपलब्ध होणार्या सधींचा फायदा न घेण्याचा आरोप होतो.अशा दोन्ही पद्धतींच्या कमी अधिक फायद्या-तोट्यांमुळे या वादाचा निष्कर्ष काढणे अशक्य वाटते-तेव्हा प्रत्येकाने आपल्याला काय पटते,रुचते ते योग्य अभ्यासाने ठरवणे योग्य. आता पुढचा प्रश्न असा येतो कि या दोन्ही पद्धतींचा एकत्र वापर करावा काय? या दोन पद्धती विरुद्ध स्वरुपाच्या असल्या तरी कितीतरी मुलभूत विश्लेषक हे त्यांना घ्यावयाच्या शेअरची खरेदी करताना योग्य वेळेची निवड करण्याकरता म्हणजेच तो शेअर अतिविक्री (OVERSOLD)झालेला आहे कि नाही ते पहाण्याकरता तांत्रिक विश्लेषणाचा सर्रास आधार घेतात.या द्वारे त्यांच्या गुंतवणूकीवर त्यांना मिळणारा फायदा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. याउलट काही तांत्रिक विश्लेषक हे आपल्या निर्णयाला निश्चिती येण्याकरता मुलभूत घटकांचा आधार घेतानाही दिसून येतात. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे विचार करून अधिक परिणामकारक आणि फायदेशीर निर्णय घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. अशा प्रकारचे वैचारिक मिश्रण केलेले काही शुद्ध विचारवंतांना पटत नसले तरी या दोन्ही पद्धतींची थोडी माहिती असणे कधीही फायद्याचे असते. यापुढच्या भागात आपण तांत्रिक विश्लेषणाची अधिक सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.
तांत्रिक विश्लेषण-भाग ३
विविध ट्रेंड्स आणि त्यांची उपयुक्तता- तांत्रिक विश्लेषणातील सर्वात महत्वाचा गणला जाणारा घटक म्हणजे "ट्रेंड".-म्हणजेच अशी दिशा किंवा साधारण कल ज्यानुसार बाजाराची अथवा एखाद्या शेअरची किंमत बदलत जाते.आता खालील आलेख किंवा चार्ट पहा.
वरील चार्टमधील चढत जाणारा कल अगदी सहजच लक्षांत येतो, मात्र नेहमीच असा स्पष्ट कल ओळखता येतोच असे नाही.खालील चार्टमध्ये इतके चढ-उतार आहेत कि त्याची नेमकी दिशा ठरवणे कठीण आहे.
आपल्याला हे माहीत असेलच कि एखाद्या शेअरची किंवा निर्देशांकाची किंमत अगदी सरळ रेषेत कधीच वाढत वा कमी होत नाही तर छोट्या छोट्या चढ-उतारांची किंवा TOP & BOTTOMS ची ती एक मालिकाच असते. आणि याच छोट्या चढ-उतारांचा तांत्रिक विश्लेषणामध्ये ट्रेंड ठरवण्यासाठी वापर केला जातो. आता खालील आलेख पहा-
हे अपट्रेंड किंवा चढत्या कलाचे उदाहरण आहे. क्र.२ हा पहिला TOP किंवा HIGH POINT आहे.यानंतर किंमत कमी झाली असून क्र.३ येथे ती पहिला तळ किंवा BOTTOM बनवत आहे. त्यानंतर आलेला क्र.४ चा TOP हा आधीच्या म्हणजेच क्र.२ च्या TOP पेक्षा उच्च पातळीवर आहे आणि नंतर आलेला क्र.५ चा BOTTOM हा त्याआधीच्या म्हणजेच क्र.३ च्या BOTTOM च्या वरच्या पातळीवर आहे. तसेच क्र.६ हा क्र. ४ पेक्षा उच्च पातळीवर आहे.अशा चढत जाणार्या TOPS & BOTTOMS ना Higher Tops/Higher Bottoms असे संबोधले जाते.आणि याप्रकारे सदर चार्टमधील अपट्रेंड निश्चित केला जातो. याउलट एखाद्या वेळी आधीच्या TOP पेक्षा नंतरचा TOP (किंवा आधीच्या BOTTOM पेक्षा नंतरचा BOTTOM ) हा खाली आला तर ट्रेंड रिवर्सलची म्हणजेच डाउनट्रेंड (उतरता कल) सुरू होण्याची शक्यता असते. आता ट्रेंडचे दोन प्रकार-अपट्रेंड आणि डाउनट्रेंड हे आपल्या चांगले लक्षांत आले असतील. या व्यतिरिक्त कधी कधी बाजार आणखी एका प्रकारे हालचाल करतो- ज्यात बाजार रेंगाळलेला असतो- विशेष चढ-उतारच नसतात, त्याला SADEWAYS TREND म्हणतात. तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने हा खरे म्हणजे ट्रेंड नसतोच तर दिशाहीनता असते. हॆ झाले ट्रेंडच्या दिशेवरून ठरणारे प्रकार. आता ट्रेंडची लांबी म्हणजेच मुदतीवरून तीन प्रकार पडतात-
* SHORT TERM TREND (अल्पावधीसाठीचा कल)- महिना वा त्यापेक्षा कमी काळ चालणारा. * INTERMEDIATE TREND (मध्यम अवधी कल -एक ते तीन महिन्याचा काळ चालणारा. * LONG TERM TREND (दीर्घ अवधी कल)- एक वर्षापेक्षा मोठा काळ चालणारा.
एका लोंगटर्म ट्रेंडच्या दरम्यान काही इंटरमिजिएट ट्रेंड असू शकतात कि जे मूळ ट्रेंडच्या विरुद्ध दिशेचे असतात. म्हणजेच एका दीर्घ अपट्रेंडमध्ये काही छोटे मध्यावधीचे वा अल्पावधीचे डाउनट्रेंड असू शकतात, त्याचप्रमाणे एका दीर्घ डाउनट्रेंड मध्ये काही मध्यावधीचे वा अल्पावधीचे अपट्रेंड असू शकतात.
येथे मूळच्या लोन्गटर्म अपट्रेंडमध्ये मध्य वा अल्पावधीचे डाउनट्रेंड सामावलेले दिसतात. ट्रेंड चा अनालिसिस करताना चार्टची निवड योग्य प्रकारे करावी लागते म्हणजेच दीर्घावधीच्या ट्रेंडचा अभ्यास करण्यासाठी पांच वर्षे कालावधीचा डॆली किंवा वीकली डाटा (रोजच्या अथवा आठवड्याच्या किंमतींची नोंद असलेला) चार्ट वापरतात. मात्र मध्यावधी वा अल्पावधीसाठी फक्त डॆली डाटा चार्ट वापरावा लागतो. ट्रेंड जेवढा मोठया अवधीचा तेवढा तो साहजिकच ठळकपणे जाणवणारा असतो.
ट्रेंडलाईन्स- ट्रेंडलाईन म्हणजे एखादा ट्रेंड दाखविणारी चार्टमध्ये काढलेली एक काल्पनिक सरळ रेषा.या रेषांचा वापर ट्रेंड आणि त्याचा रिवर्सल म्हणजे ट्रेंड बदलण्याची क्रिया दर्शवण्यासाठीही करतात. खालील चार्टमध्ये एक अपट्रेंड दिसत असून प्रत्येक LOW किंवा खालच्या बाजूच्या बिंदूंस जोडणारी एक सरळ रेषा काढलेली आहे.ही ट्रेंडलाईन, त्या विशिष्ट शेअरच्या किंमतीत होणारी घट जेव्हा जेव्हा थांबते त्या सर्व बिंदूंस जोडणारी आहे.म्हणजेच ही ट्रेंडलाईन सपोर्ट (आधार पातळी) दाखविणारी रेषा आहे. दुसर्या शब्दात सांगायचे तर या ट्रेंडलाईनमुळे किंमत घटण्याची प्रक्रिया थांबून ती परत वाढणे नेमके कधी सुरू होइल हे ठरवणे शक्य होते.
याचप्रकारे डाउनट्रेंड मध्ये अशी सरळ रेषा ही सर्व HIGH POINTS ना जोडणारी काढली जाते आणि ती रेषा, जेथे किंमत वाढणे थांबून कमी व्हायला सुरुवात होते ते सर्व बिंदू जोडणारी असते- म्हणजेच ती असते रेसिस्टन्स लेवल (विरोध पातळी) दाखविणारी रेषा.
CHANNELS ( चाकोरी )- वरील विवेचनाप्रमाणे जर आधार आणि विरोध अशा दोन पातळी दाखविणार्या दोन समांतर रेषा जर चार्टमध्ये काढल्या तर त्याने बनतो तो चानेल. खालील आकृती पहा- या चार्ट मध्ये उतरता म्हणजेच डाउनट्रेंड चानेल दाखविला आहे. अशा प्रकारे वरील बाजूस उच्चबिंदू व खालील बाजूस नीचबिंदूंना जोडणार्या दोन सरळ रेषांनी बनलेला हा चानेल अपट्रेंड, डाउनट्रेंड वा साईडवेज असा कुठलाही कल दाखवू शकतो. कल कोणताही असला तरी मूळ गृहीतक असे कि सदर शेअरची किंमत या दोन पातळ्यांमध्येच बरेच वेळा वरखाली होत रहाते. अशी चाकोरीबद्ध प्रक्रिया काही महिनेसुद्धा चालू शकते. जोपर्यंत किंमत खालील वा वरील बाजूची ट्रेंडलाईन तोडून त्याबाहेर जात नाही तोपर्यंत आहे हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असते. जर एखाद्या वेळी किंमतीने दोन्हीपैकी कोणतीही पातळी तोडली तर त्या दिशेने किंमत आणखी पूढे जाण्याची शक्यता असते.यालाच ब्रेकआउट (वरील बाजूस तोडण्याची क्रिया) व ब्रेकडाऊन (खालील बाजूस तोडण्याची क्रिया) असे म्हणतात. अशा प्रकारे चानेल्स हे कल दाखविण्याबरोबरच आधार व विरोध अशा महत्वाच्या पातळ्या दर्शविण्याचे काम करतात. वरील विवेचनातून आपण जर ट्रेंड ओळखणे शिकलो तर त्याविरुद्ध जाऊन आपण चूकीची खरेदी वा विक्री करणार नाही. तांत्रिक विश्लेषणामध्ये "TREND IS YOUR FRIEND" असे म्हटले जाते, एवढे "ट्रेंड" या संकल्पनेला महत्व आहे.या मित्राचा हात धरून ठेवा-तो आपल्याला कधी दगा देणार नाही! पूढील भागात- आधार व विरोध पातळी विषयी विवेचन.
तांत्रिक विश्लेषण - भाग ४
आधार आणि विरोध पातळी तांत्रिक विश्लेषणातील ट्रेन्ड किंवा कल म्हणजे काय हे यापूर्वीच्या भागातून आपल्याला समजले असेलच.आता आपण आणखी एक महत्वाची संकल्पना समजून घेउया- "आधार आणि विरोध पातळी"( SUPPORT & RESISTANCE LEVELS).आता खालील आकृती पहा-
आकृतीत दाखविल्याप्रमाणे SUPPORT किंवा आधार म्हणजे अशी पातळी एखाद्या ठराविक कालावधीमध्ये एखाद्या शेअरची किंवा निर्देशांकाची किंमत त्याखाली शक्यतो जात नाही.आक्रुतीत ही आधार पातळी निळ्या बाणांनी दाखवली आहे.त्याचबरोबर RESISTANCE वा विरोध पातळी म्हणजे अशी पातळी कि जिच्या वर सहसा किंमत वाढत नाही.लाल रंगाचे बाण विरोध पातळी दाखवत आहेत. बाजारात अशा ठराविक पातळी का तयार होतात? कारण या दोन्ही पातळींवर बाजारात विशेष प्रमाणात मागणी (SUPPLY)वा पुरवठा (DEMAND) होत असतो.आधार पातळीवर बाजारातील बरेच ट्रेडर्स खरेदी करू बघतात तर विरोध पातळीवर बरेचजण विक्री करत असतात. म्हणजेच या दोन्ही पातळी बाजाराची मानसिकता दाखवितात. जेव्हा या पातळी तोडल्या जातात तेव्हा त्या विशिष्ट शेअरच्या बाबतीत बाजारातल्या मागणी व पुरवठ्याचे प्रमाण तसेच बाजाराची मानसिकता बदलून यापुढे नव्या आधार व विरोध पातळी तयार होत असतात. कधीकधी आपल्याला असे आढळते कि बर्याचदा शेअरच्या किंमती या ९० ते १०० किंवा १००० वा ११०० अशा प्रमुख आकड्यांमध्ये म्हणजेच ROUND FIGURES मध्ये वरखाली होत असतात. १०,२०,५० १५० अशा ठराविक पातळी, या आधार वा विरोध पातळी बनून राहतात. याचे कारण निव्वळ Psycology म्हणजेच ट्रेडर्सची मानसिकता आहे. उदा. गेले काही दिवस रिलायन्स ईंड. ची किंमत ही १००० ते ११०० या मध्येच प्रामुख्याने फिरत आहे. म्हणजेच रिलायन्सचा शेअर पडून १००० च्या आसपास आला कि बरेच जण तो खरेदी करणे सुरू करतात आणि त्यामुळे पुरवठ्यापेक्षा मागणी वाढून तो शेअर पडायचा थांबतो आणि पुन्हा वाढू लागतो. त्याउलट तो ११०० च्या जवळपास आला कि बरेच (किंवा तेच) ट्रेडर्स तो विकून टाकणे पसंत करतात आणि त्यामुळे पुरवठा वाढून त्यापुढे किंमत जाणे कठीण होऊन बसते. अशा प्रकारे लोकांच्या मानसिकतेमुळे आपोआपच आधार वा विरोध पातळी तयार होत जातात. आधार आणि विरोध पातळीची अदलाबदल- जर का एखादी विरोध पातळी मोडली गेली तर तिची भूमिका बदलते-म्हणजेच विरोध पातळीचे आधार पातळीत रुपांतर होते. म्हणजे नक्की काय होते? एखाद्या शेअरने आपली विरोध पातळी मोडून आगेकूच केली तर असे समजले जाते कि त्या शेअरच्या बाबतीत मागणी-पुरवठ्याचे प्रमाण व बाजाराची मानसिकता आता बदलली आहे आणि पुढील काळात त्या ठराविक पातळीच्या खाली तो शेअर येणे कठीण आहे, म्हणजेच आता त्या शेअरच्या बाबतीत त्याची पूर्वीची विरोध पातळी आता आधार पातळी म्हणून काम करू लागली आहे.याउलट शेअरची किंमत एखाद्या आधार पातळीच्या खाली गेली तर पुढील काळात तीच पातळी विरोध पातळी म्हणून काम करते.अर्थातच असा बदल होण्यासाठी त्या शेअरच्या किंमतीने मजबूतपणे वा निश्चितपणे एखादी पातळी मोडणे आवश्यक असते.
वरील आकृतीत तुटक रेषेने दाखविलेली विरोध पातळी ही किंमतीला अधिक वाढण्यास बिंदू १ व २ येथे विरोध करत आहे.मात्र एकदा हा विरोध मोडून किंमत त्यावर गेली कि तीच पातळी किंमतीला त्याखाली येण्यापासून रोखते-पहा बिंदू ३ व ४ जवळ येऊन किंमत परत वाढलेली आहे. अशा प्रकारची घटना सर्वच शेअरच्या वा निर्देशांकाच्या बाबतीत दिसून येते, -विशेषकरून जेव्हा तो शेअर SIDEWAYS कल दाखवत असेल तेव्हा. आधार आणि विरोध पातळी या तांत्रिक विश्लेषणात अतिशय महत्वाच्या आहेत कारण खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेण्यासाठी आणि TREND REVERSAL ओळखण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. उदा. आपल्याला निरीक्षणाअंती एखाद्या शेअरची विरोध पातळी माहीत झाली असेल, म्हणजेच त्या पातळीपर्यंत वाढून किंमत पुन्हा पुन्हा उतरत असेल तर त्या पातळीजवळ विक्री करून फायदा खिशात टाकता येतो. तांत्रिक विश्लेषणाचा वापर करणार्याने आधार व विरोध पातळी या आपल्या निरीक्षणाने ओळखणे जरूरी आहे.चढता कल दाखविणार्या शेअरने जर का आपली विरोध पातळी मोडून वरील प्रदेशात (ZONE) प्रवेश केला तर ट्रेंड न बदलता किंमत आणखी वाढण्याची शक्यता असते मात्र चढत्या ट्रेंडमध्ये जर का आधार पातळी तुटली तर तेथे ट्रेंड बदलण्याची दाट शक्यता असते. मात्र कधी कधी संपूर्ण बाजाराच्या रेट्यामुळे वा एखाद्या मोठ्या घडामोडीमुळे असा बदललेला ट्रेंड त्वरीत पुन्हा पूर्ववत होण्याची क्वचित शक्यता असते. अशा प्रकारच्या आधार व विरोध पातळीबद्दल माहिती असण्यामुळे आपल्या ट्रेडींग करण्याच्या पद्धतीत एक प्रकारची शिस्त येते व आपले निर्णय हे अधिक अचूक ठरतात. आधार वा विरोध पातळी या राऊण्ड फिगर असतील तर प्रत्यक्ष तेथे पोचण्याच्या थोडे आधीच किंमत परतीचा रस्ता धरण्याची शक्यता असते, तेव्हा अचूक पातळीवर खरेदी वा विक्रीचा अट्टाहास न करता थोडे अगोदर करणे श्रेयस्कर ठरते. उदा. एखाद्या शेअरची १०० ही विरोध पातळी आपल्याला माहीत झाली आहे, तर तो शेअर बरोबर १०० रु.पर्यंत वाढण्याची वाट न बघता ९८ वा ९९ रु.ला विकून टाकल्यास बर्याचदा निराशा आणि कालापव्यय टाळता येतो. त्याचप्रमाणे एखादा शेअर खरेदी करायचा ठरला असेल तर त्याच्या नेमक्या आधार पातळी च्या किंचित वर असतानाच तो घेणे बर्याचदा शहाणपणाचे ठरते कारण अचानक तो वाढायला लागल्याने खरेदीची संधी हुकणे शक्य असते.
तांत्रिक विश्लेषण- भाग ५
वोल्युम किंवा उलाढाल वोल्युम म्हणजे एका ठराविक काळासाठी,- उदा.एका दिवसामध्ये- बाजारात व्यवहार झालेल्या शेअर्सची संख्या.जितका हा आकडा मोठा तेवढा तो शेअर क्रियाशील समजण्यात येतो.वोल्युम कमी झाला कि जास्त हे पहाण्यासाठी सामान्यत: चार्टच्या तळाशी वोल्युम बार्स दाखविलेले असतात.यामुळे कोणत्या वेळी किती शेअर्सचा व्यवहार झाला आणि वोल्युमचा ट्रेंड किंवा कल चढता आहे कि उतरता आहे हे समजते. वोल्युम हा तांत्रिक विश्लेषणातील महत्वाचा घटक आहे कारंण त्यामुळे बाजाराचा कल ओळखणे सोपे जाते. म्हणजेच एखाद्या शेअरच्या किंमतीत होणारी वाढ किंवा घट ही जर सरासरीपेक्षा जास्त वोल्युमसह होत असेल तर ती वाढ विश्वासार्ह किंवा तो कल नक्की समजला जातो,आणि सरासरीपेक्षा कमी वोल्युमसह होणारी वाढ किंवा घट ही अनिश्चित स्वरुपाची समजली जाते. म्हणजे जर एखाद्या शेअरमध्ये वाढ होत असेल तर ती तशीच पुढे चालू राहील कि तात्पुरती ठरेल हे ठरवण्यासाठी आपल्याला वोल्युम कसे आहेत हे पहावेच लागेल. उदा. एखाद्या शेअरचा उतरता कल चालू असताना जर एखाद्या दिवशी तो शेअर वाढलेला दिसला तर तो ट्रेंड रिवर्सल आहे कि नाही हे समजण्यास वोल्युमची मदत होते.जर या दिवशी वोल्युम हे इतर दिवशीच्या सरासरी वोल्युमपेक्षा जास्त असतील तर तो ट्रेंड रिवर्सल असण्याची शक्यता असते, मात्र वोल्युम कमी असतील तर ती तात्पुरती वाढ असण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे कमी वोल्युमसह होणारी घट ही तात्पुरती समजली जाते तर घट होताना वोल्युम जास्त असतील तर अधिक घट होण्याची शक्यता असते. वोल्युम हे ट्रेंड प्रमाणे बदलले पाहिजेत म्हणजेच चढत्या किंमतीला अधिक वोल्युम व उतरत्या किंमतीला कमी वोल्युम- असे असेल तर तो उत्तम वाढ दाखविणारा कल असतो, आणि असे व्हायचे थांबले ( म्हणजे किंमत वाढत आहे पण वोल्युम मात्र कमी होत आहेत) तर ते उतरता कल सुरू होण्याचे चिन्ह मानले जाते. याव्यतिरिक्त वोल्युमचा उपयोग हा निरनिराळे चार्ट पेटर्न जसे कि HEAD & SHOULDERS, TRIANGLES,FLAGS (या विषयी आपण नंतर माहिती घेणारच आहोत.)ची निश्चिती करण्यासाठी केला जातो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे वोल्युम हे प्रत्यक्ष किंमतीच्याही आधी इशारा देतात. म्हणजेच चढत्या कलामध्ये प्रत्यक्ष किंमत कमी होण्याच्या आधीच कमी झालेले वोल्युम आपल्याला धोक्याचा इशारा देत असतात म्हणूनच तांत्रिक विश्लेषणात वोल्युम हा फार महत्वाचा घटक मानला जातो.
तांत्रिक विश्लेषण - भाग ६
चार्ट्स - कालावधी व प्रमाण चार्ट म्हणजे एका ठराविक काळासाठी किंमतींच्या नोंदींचा आलेख हे तर आपल्याला माहित आहेच. उदा. एखाद्या वर्षासाठीच्या चार्टमध्ये प्रत्येक बिंदू हा सदर शेअरचा व्यवहार झालेल्या प्रत्येक दिवशीच्या बंद भावाची नोंद दाखवत असतो. वरील आकृतीत दीड वर्षाचा आलेख दाखवला आहे.आलेखाच्या तळाशी आडव्या म्हणजेच x-अक्षावर तारीख आहे, म्हणजेच कालावधी आहे. उजव्या हाताला उभ्या असलेल्या y-अक्षावर त्या शेअरची किंमत दाखवली आहे.चार्टकडे पाहून आपण चट्कन सांगू शकतो कि ओक्टो.’०४ (बिंदू १) पासून जून ’०५ (बिंदू २) पर्यंतच्या काळासाठी या शेअरची किंमत वाढलेली आहे. काळासाठीचे प्रमाण - (Time scale) - चार्टच्या तळाशी असलेले टाईम स्केल हे एका सेकंदापासून काही दशकांपर्यंत असे कोणतेही असू शकते. साधारणपणे एक-दिवसीय(Intraday),डेली,वीकली,मंथली,तिमाही आणि वार्षिक असे विविध स्केल वापरले जातात. हे स्केल जेवढे छोटे तेवढा चार्ट हा अधिक अचूक आणि सविस्तर माहिती देणारा असतो,म्हणजेच डेली चार्टमध्ये प्रत्येक दिवशीची ओपन, हाय,लो आणि क्लोज अशा सर्व किंमतींची नोंद असते तर वार्षिक चार्टमध्ये प्रत्येक दिवशीचा फक्त बंद भाव दिसू शकतो. इंट्राडे चार्टमध्ये ओपनिंग बेलपासून क्लोसिंग बेलपर्यंत दर दोन मिनिटाच्या अंतराने किंमतीची नोंद असू शकते. वीकली, मंथली, तिमाही आणि वार्षिक चार्टस हे दीर्घ मुदतीच्या अनालिसिससाठी वापरतात.या चार्टमधील प्रत्येक बिंदू हा एका ठराविक काळात काय घडले त्याचे प्रतिनिधीत्व करतो. उदा. एखाद्या चार्टमध्ये पांच वर्षाचा कालावधी दाखवला असेल, त्यात विकली डाटा किंवा नोंद असेल तर आलेखावरील प्रत्येक बिंदू हा त्या आठवड्याचा बंद भाव दाखवत असेल आणि तो बंद भाव हा त्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीचा म्हणजेच सामान्यत: शुक्रवारचा बंद भाव असेल. प्राईस स्केल - चार्टच्या उजव्या हाताला किंमत दर्शवणारे प्रमाण किंवा स्केल आहे. हे दोन प्रकारचे असू शकते - लिनीअर आणि लोगरिथमिक.
लिनीअर स्केलमध्ये प्रत्येक आकड्यामधील अंतर हे सारखेच असते, उदा.१०,२०,३०,४०. म्हणजे १० पासून २० पर्यंत किंमतीत झालेली हालचाल ही ४० पासून ५० पर्यंत झालेल्या हालचालीएवढेच अंतर प्रत्यक्ष चार्टवर दाखवते. प्राईस स्केल हे लोगरिथमिक असेल तर दोन बिंदूंमधील अंतर हे किंमतीच्या टक्केवारीतील बदल दाखवते. उदा. १० पासून २० पर्यंत किंमतीत झालेली वाढ ही १०० % वाढ आहे तर ४० पासून ५० पर्यंत किंमतीत झालेली वाढ ही फक्त २५ % वाढ आहे, म्हणून लोगरिथमिक स्केलमध्ये १० पासून २० पर्यंतचा किंमतीतील बदल हा मोठ्या अंतराने तर ४० पासून ५० पर्यंत झालेला बदल हा त्या मानाने छोट्या अंतराने दाखविला जातो. आकृती मध्ये १० पासून २० पर्यंतचे अंतर हे २० पासून ४० पर्यंतच्या अंतराएवढेच दाखवले आहे कारण हे दोन्ही फरक हे १०० % वाढ दाखवतात.
तांत्रिक विश्लेषण -भाग ७
चार्ट्सचे प्रकार - साधारणत: चार प्रकारचे चार्ट्स त्यांच्या विशिष्ट उपयुक्ततेनुसार वापरात आहेत. * लाईन चार्ट , * बार चार्ट , * केन्ड्लस्टिक चार्ट , * पोइन्ट एन्ड फिगर चार्ट*
लाईन चार्ट - सर्वात साधा आणि प्राथमिक असलेला लाईन चार्ट हा फक्त एका विशिष्ट काळातील दिवसांच्या बंद भावांची नोंद करत असतो. त्या सर्व बंद भावांच्या बिंदूंना जोडणारी एक सलग रेषा काढली जाते.या चार्टमध्ये ओपनिंग भाव व लो, हाय इत्यादी सविस्तर माहिती नसते. कारण बंद भाव हा हाय व लो इ. पेक्षा महत्वाचा समजला जातो.
* बार चार्ट - लाईन चार्टपेक्षा थोडी अधिक सविस्तर माहितीची नोंद करण्यासाठी बार चार्ट वापरतात.यात प्रत्येक दिवसाच्या ओपन, हाय , लो, व बंद भावांची नोंद करण्यासाठी एक उभी रेषा (बार) काढतात.या रेषेच्या डाव्या बाजूस एका अगदी छोट्या आडव्या खूणेने त्या दिवशीचा ओपन भाव दर्शवला जातो, तर उजव्या बाजूस तशाच प्रकारच्या खूणेने बंद भाव दर्शवला जातो. समजा डाव्या बाजूस असलेली ही खूण (म्हणजेच ओपन भाव) , हा उजव्या बाजूला असलेल्या खूणेपेक्षा (म्हणजेच बंद भावापेक्षा) खालील बाजूस असेल- याचाच अर्थ त्या दिवशी बंद होतानाचा भाव हा ओपन भावापेक्षा वाढलेला असेल तर त्या दिवशीची उभी रेषा ही निळ्या वा काळ्या रंगात दाखवली जाते. या उलट डाव्या बाजूची खूण, उजव्या बाजूच्या खूणेपेक्षा वर असेल, म्हणजेच बंद भाव हा ओपन भावापेक्षा कमी असेल तर त्या दिवशीची उभी रेषा तांबड्या रंगाने काढली जाते. अशा प्रकारे एका दृष्टीक्षेपात त्या विशिष्ट कालावधीत काय झाले हे पहाता येते.
* केन्ड्लस्टिक चार्ट - बार चार्ट प्रमाणेच केन्ड्लस्टिक चार्ट हा ओपन, हाय, लो व बंद भावांची नोंद करतो मात्र याची रचना थोडी वेगळी असते.बार चार्टप्रमाणेच यात हाय आणि लो भाव दाखवण्यासाठी उभी रेषा काढली जाते.मात्र ओपन व बंद भाव दाखवण्यासाठी एक रुंद बार (केन्डल) काढला जातो. जर त्या दिवशीचा ओपन भाव हा बंद भावापेक्षा कमी असेल तर हा रुंद बार किंवा केन्डल पोकळ अथवा सफेद रंगाने दाखवतात, आणि जर बंद भाव हा ओपन भावापेक्षा कमी असेल तर त्या दिवशीचा केन्डल हा काळ्या वा तांबड्या रंगाने दाखवतात.
* पोइन्ट एन्ड फिगर चार्ट.- हा फार जुन्या काळापासून वापरला जात असला तरी आता फार प्रचलित नसलेला चार्टचा प्रकार आहे. त्याविषयी माहिती घेण्याची जरूरी नाही, मात्र तो कसा दिसत असे हे कुतुहल म्हणून वरील आकृतीत दाखवले आहे. अशा प्रकारे विविध चार्ट हे तांत्रिक विश्लेषणातील अतिशय महत्वाची आणि पायाभूत बाब असून हे चार्ट काय माहिती दाखवितात आणि तीचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे
तांत्रिक विश्लेषण -भाग ८
चार्ट पेटर्न्स- चार्ट पेटर्न्स म्हणजे एखाद्या शेअरच्या वा निर्देशांकाच्या चार्टमध्ये एखादी विशिष्ट अशी आकृती अथवा रचना निर्माण होते कि जिचा उपयोग ट्रेडींग सिग्नल अथवा आगाऊ इशारा म्हणून केला जातो-किंवा ती आकृती म्हणजे भविष्यातील किंमतीत होणार्या बदलाचे चिन्ह समजले जाते. यापूर्वी तांत्रिक विश्लेषणाविषयी जाणून घेताना आपल्याला हे माहित झाले आहे कि "इतिहासाची पुनरावृत्ती होते" हे तांत्रिक विश्लेषणाचे एक गृहितक आहे. चार्ट पेटर्न्समागचा विचार हा यावरच आधारित आहे.दीर्घ कालावधीच्या चार्टस मध्ये काही पेटर्न्स पुन्हा पुन्हा तयार होत असलेले दिसतात आणि ते आपल्याला बहुतेक वेळेला पुढील हालचालीची आगाऊ माहितीही देतात.त्यामुळे ट्रेडींग करताना या संधीचा उपयोग केला जातो. मात्र हे एक सर्व साधारण आणि सर्व प्रकारच्या चार्टना लागू होणारे साधन असले तरी ते १००% विश्वासार्ह मात्र समजले जात नाही.आपल्याला अपेक्षित असा पेटर्न अचूकपणे तयार झाला आहे कि नाही यावर वाद होवू शकतो आणि म्हणूनच चार्टिंग हे "शास्त्र" नसून "कला" आहे असेही म्हटले जाते. पेटर्न्सचे दोन प्रकार आहेत-रिवर्सल आणि कंटिन्युएशन. रिवर्सल पेटर्न हा आधीचा ट्रेण्ड बदलून उलट ट्रेन्ड सुरू होणार असल्याचे सुचित करतो, तर कंटिन्युएशन पेटर्न हा आधीचाच ट्रेन्ड सुरू रहाणार असल्याचे सुचित करतो. आपण या भागात काही लोकप्रिय पेटर्न्सविषयी माहिती घेणार आहोत.
हेड आणि शोल्डर्स - नावावरूनच या पेटर्नविषयी आपण अंदाज बांधू शकता.तांत्रिक विश्लेषणातील हा एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रकार आहे.हा रिवर्सल पेटर्न असून हा पेटर्न तयार झाला कि ट्रेन्डमध्ये बदल होणार हे ओळखता येते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे "हेड आणि शोल्डर्स-टोप" आणि "हेड आणि शोल्डर्स-बोटम" अशा दोन प्रकारे तयार होत असतो. पहिल्या प्रकारचा पेटर्न हा चढत्या ट्रेन्डच्या शेवटी अगदी शिखराजवळ तयार होत असतो आणि हा तयार झाल्यावर उतरता ट्रेन्ड सुरू होणार हे ओळखले जाते.याउलट दुसरा म्हणजे "हेड आणि शोल्डर्स-बोटम" हा पेटर्न उतरत्या ट्रेन्डच्या शेवटी म्हणजेच तळाला तयार होत असतो, आणि यानंतर चढता कल सुरू होणार असल्याचे सुचित करतो. या हेड आणि शोल्डर्सच्या मध्ये जो "नेकलाईन" म्हणजे मानेसारखा भाग आहे तेथे विरोध पातळी असल्याचे मानण्यात येते.
कप आणि हेन्डल - चहाचा कप आणि त्याचा कान अशा काहीशा आकाराचा हा पेटर्न असून हा बुलीश कंटिन्युएशन प्रकारचा पेटर्न आहे म्हणजेच याच्या निश्चितीनंतर आधीचाच चढता कल कायम राहून किंमत आणखी वाढणार असल्याचे सुचित होत असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या कपाच्या आकाराच्या आधी चढता कल असून कपाचा आकार व नंतर येणारा हेन्डलचा आकार हा डाऊनट्रेन्ड वा साईडवेज प्रकारची हालचाल दाखवतो आणि एकदा का हे हेन्डल पूर्ण तयार झाले कि मग हेन्डलच्या वरचे बाजूस असलेल्या विरोध पातळी तोडून आधीचाच बूलीश ट्रेन्ड पुन्हा सुरू होत असतो. अशा प्रकारचा "कप आणि हेन्डल" पेटर्न तयार होण्यासाठी काही महिने अथवा वर्षापेक्षा जास्त काळ लागू शकतो. पुढील भागात पाहूया आणखी काही चार्ट पेटर्न्स.
तांत्रिक विश्लेषण - भाग ९
चार्ट पेटर्न्स डबल टोप व डबल बोटम्स - ट्रेन्ड रिवर्सल दाखविणारा हा एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह समजला जाणारा चार्ट पेटर्न आहे. एखाद्या दीर्घ ट्रेन्डच्या शेवटी निर्माण होवून यामुळे रिवर्सलची सुचना मिळत असते. जेव्हा एखादी आधार किंवा विरोध पातळी दोन वेळा स्पर्श करूनही तुटत नसेल तर अशा वेळेला हा पेटर्न तयार होतो, आणि मध्य व दीर्घ अवधीसाठीचा ट्रेन्ड रिवर्सल समजला जातो. खालील आकृतीत डाव्या बाजूला डबल टोप, तर उजव्या बाजूला डबल बोटम प्रकारचा पेटर्न दाखवला आहे. दोन्हीही आकृतीत विरोध व आधार पातळी तोडण्यात दोन वेळेला अपयश आल्यानंतर ट्रेन्ड रिवर्सल झालेला दिसत आहे.
त्रिकोणाकृती पेटर्न्स - हे ही तांत्रिक विश्लेषणातील प्रसिद्ध पेटर्न्स असून यात तीन प्रकार असतात- १)साधा किंवा समभूज त्रिकोण २) चढता त्रिकोण ३) उतरता त्रिकोण हे पेटर्न्स हे दोन आठवड्यापासून काही महिन्यापर्यंतच्या काळात तयार होवू शकतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे साध्या किंवा समभूज त्रिकोणात दोन ट्रेन्डलाईन या एकमेकीच्या जवळ येत आहेत.यात वर वा खाली, ज्या बाजूला ब्रेक-आऊट होईल तो ट्रेन्ड काचढत्या त्रिकोणात वरची ट्रेन्डलाईन ही सरळ जात असून खालची ट्रेन्डलाईन ही वरील बाजूस चढत गेली आहे.हा एक बुलीश पेटर्न समजला जातो आणि यात वरील बाजूस ब्रेक-आऊट अपेक्षित असतो. याच्या उलट उतरत्या त्रिकोणात खालची ट्रेन्डलाईन सरळ असून वरची ट्रेन्डलाईन उतरत जात असते.हा बेअरीश पेटर्न असून यात खालील बाजूस ब्रेक-आऊट होण्याची अपेक्षा असते.यम झाला असे समजले जाते.
तांत्रिक विश्लेषण - भाग १०
चार्ट पेटर्न्स- FLAG & PENNANTS - फ्लेग आणि पेनंट्स हे शोर्ट-टर्म पेटर्न्स असून एखाद्या दिशेने होणार्या तीव्र हालचालीनंतर काही काळ साईडवेज प्रकारची हालचाल होवून पुन्हा मुळच्याच दिशेने जोराची हालचाल होते तेव्हा हे तयार होत असतात. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे पेनंट प्रकारच्या पेटर्नमध्ये मधला म्हणजेच साईडवेज हालचालीचा भाग हा त्रिकोणाकृती सारखा म्हणजेच निमूळत्या ट्रेन्डलाईन मधील भाग आहे, तर फ्लेग पेटर्नमध्ये हाच मधला भाग हा चानेल सारखा म्हणजे समांतर ट्रेन्डलाईन मधील भाग आहे. हा दोन्ही पेटर्नमधील फरक असला तरी दोन्ही पेटर्नमध्ये मुळचा अपट्रेन्ड हा पुढे सुरू राहण्याची अपेक्षा असते. GAPS - एका ठराविक काळात असलेली किंमत ही नंतर दुसर्या काळाच्या सुरुवातीसच एकदम फरकाने वाढलेली अथवा कमी झालेली असली तर हा पेटर्न तयार होतो. उदा एखाद्या दिवशी मोठ्या फरकाने ओपन होणारा बाजार. या GAPS काही विशेष घडामोडी अथवा बातमीचा परिणाम असतात.या GAPS बार चार्ट आणि केन्डलस्टिक चार्ट मध्येच दिसू शकतात. एखाद्या ट्रेन्डच्या सुरुवातीला तयार झालेल्या Gap ला ब्रेक-अवे Gap असे म्हणतात. ट्रेन्डच्या मध्ये आल्यास रन-अवे Gap, तर ट्रेन्डच्या शेवटी येणार्या Gap ला Exhaustion Gap असे म्हणतात.
तांत्रिक विश्लेषण -भाग ११
चार्ट पेटर्न्स- ट्रिपल टोप्स आणि बोटम्स - हे आणखी एका प्रकारचे रिवर्सल चार्ट पेटर्न्स आहेत.आपण पूर्वी पाहिलेल्या हेड एन्ड शोल्डर्स किंवा डबल टोप्स / बोटम्स यांच्याएवढे प्रसिद्ध नसले तरी ते त्यांच्याप्रमाणेच काम करतात. जेव्हा किंमतीमधील हालचाल ही सपोर्ट किंवा रझिस्टन्स लेवलला तीन वेळेला स्पर्श करूनही जेव्हा ती लेवल तोडण्यात अयशस्वी होते तेव्हा तो ट्रेन्ड रिवर्सल समजण्यात येतो. आता येथे एक बाब नीट ध्यानात घ्या- कि जेव्हा याच्या अगोदर डबल टोप किंवा बोटम तयार होतो तेव्हा ट्रेन्ड रिवर्सलचा इशारा मिळाल्यामुळे उलट्या दिशेने लगेचच खरेदी / विक्रीचा निर्णय घेतला गेला तर ती चूक ठरू शकते. तेव्हा तिसरा टोप / बोटम तयार होण्याची शक्यता ध्यानात घेवूनच खरेदी / विक्रीचा निर्णय घ्यावा. ( माझ्या मते अशा काही बाबतीत चार्ट पेटर्नच्या मर्यादाही स्पष्ट होतात.)
राऊंडींग बोटम - "राऊंडींग बोटम" या प्रकाराला "सोसर बोटम" ( बशी चा आकार ) असेही म्हणतात. हा एक लोन्ग टर्म रिवर्सल पेटर्न असून हा डाउनवर्ड ट्रेन्ड संपून अपवर्ड ट्रेन्ड सुरू झाल्याचे दर्शवतो. काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत याचा कालावधी असतो.मात्र हा एक बराच विश्वासार्ह प्रकार असून अल्पावधीसाठीही वापरता येतो असा माझा स्वत:चा अनुभव आहे. हा पेटर्न "कप आणि हेन्डल" पेटर्न सारखा दिसत असला तरी यात हेन्डल असत नाही.
तांत्रिक विश्लेषण - भाग १२
मूव्हींग एवरेजेस- एखाद्या शेअरच्या वा निर्देशांकाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असले तर आपल्याला त्याची नक्की दिशा कळणे कठीण होते. यातून मार्ग काढण्यासाठी मूव्हींग एवरेज या तंत्राचा वापर सुरू झाला.मूव्हींग एवरेज म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी त्या शेअरच्या बंद भावांची सरासरी. उदा.१० दिवसांच्या पिरिअडची मूव्हींग एवरेज म्हणजे त्या १० दिवसांच्या बंद भावांची सरासरी होय.अशा सरासरी किंमतीचा मग ग्राफ काढला जातो आणि त्यावरून त्या शेअरची दिशा ठरवली जाते. कालावधी जेवढा जास्त तेवढा हा ग्राफ कमी चढ-उतार असलेला (smooth)असतो आणि यामुळे तात्पुरत्या वरखाली होणार्या किंमतीमुळे होणारी दिशाभूल टाळणे शक्य होते.
१) सिम्पल मूव्हीन्ग एवरेज (SMA)- खालील आकृती पहा. लाल रंगातील कमी पिरिअडच्या म्हणजेच १० दिवसांच्या मूव्हींग एवरेजचा ग्राफ हा हिरव्या रंगाच्या म्हणजेच ५० पिरिअडच्या ग्राफच्या तुलनेत अधिक उतारचढाव दाखवतो, तसेच गुलाबी रंगाच्या (२०० दिवस) मूव्हीन्ग एवरेजमध्ये चढउतार फारसे दिसत नाहीत. सिम्पल मूव्हीन्ग एवरेजमध्ये एखाद्या कालावधीच्या सर्व दिवसांना सारखेच महत्व (वेटेज) दिले जाते- म्हणजेच त्या कालावधीच्या सर्व दिवशीच्या बंद भावांची साधी बेरीज करून तीला दिवसांच्या संख्येने भागले जाते. या प्रकारच्या मूव्हींग एवरेजमध्ये अगदी अलिकडील भावाला पूर्वीच्या भावाएवढीच किंमत असल्याने यावर आक्षेप घेतला जातो.यावर उपाय म्हणून मूव्हीन्ग एवरेजेसचे वेगळे प्रकार शोधले गेले.
२) लिनीअर वेटेड एवरेज- या प्रकारामध्ये प्रत्येक दिवशीच्या बंद भावाला वेगवेगळे महत्व दिले जाते.उदा. सोमवार ते शुक्रवार या ५ दिवसांचा पिरिअड असेल तर सोमवारच्या म्हणजेच पहिल्या दिवशीच्या बंद भावाला १ ने गुणले जाते, मंगळवारच्या म्हणजे दुसर्या दिवशीच्या भावाला २ ने आणि असेच पुढे शुक्रवारपर्यंत येणार्या किंमतींची बेरीज केली जाते, आणि त्या बेरजेला १+२+३+४+५ ची बेरीज म्हणजेच १५ ने भागले जाते. अशा प्रकारे त्या ५ दिवसांची लिनीअर वेटेड मूव्हीन्ग एवरेज काढली जाते.यामुळे सर्वात अलिकडच्या म्हणजे शुक्रवारच्या बंद भावाला जास्त महत्व मिळते आणि ग्राफ अधिक प्रातिनिधीक आणि अचूक बनतो.
३) एक्सपोनन्शियल मूव्हीन्ग एवरेज (EMA)- यामध्ये आकडेमोड खूपच आहे,आणि मूव्हीन्ग एवरेजेसच्या किंमती रेडीमेड सोफ़्टवेअरच्या सहाय्याने उपलब्ध असल्याने एक ट्रेडर म्हणून त्याला महत्व न देता मूव्हीन्ग एवरेजचा वापर ट्रेडींगसाठी कसा करायचा या गोष्टीला महत्व द्यायला हवे. मात्र एक्सपोनन्शियल एवरेजमध्ये देखील सर्वात अलिकडच्या बंद भावांना अधिक महत्व दिले आहे एवढे ध्यानात घेतले तरी पूरेसे आहे. खालील आक्रुतीचे SMA आणि EMA ( दोन्हींचा पिरिअड १५ दिवस आहे) यांच्या तुलनेसाठी निरीक्षण करा. SMA च्या तुलनेत EMA ही किंमतीत होणार्या बदलांना अधिक प्रतिसाद देत असल्याचे किंवा संवेदनशील असल्याचे दिसून येते.
Scroll to Top